उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आली आहे. या विशेष सेवांमध्ये जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या बडनेरा–नाशिक रोड विशेष गाड्यांचाही समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या सुट्ट्यांमुळे मेमू, मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने जळगाव व भुसावळ स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्या सुरू करून प्रवाशांची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाहीर करण्यात आलेल्या १४८४ विशेष गाड्यांपैकी ७४९ गाड्या आरक्षित तर ७३५ गाड्या अनारक्षित असणार आहेत. वाढत्या मागणीनुसार काही मार्गांवर विशेष गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई/दौंड–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, नाशिक रोड–बडनेरा तसेच हडपसर–हरंगुळ या महत्त्वाच्या मार्गांवरही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.
या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने प्रवासी सुविधांमध्ये वाढ केली असून नेटवर्कमध्ये विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या विशेष गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांची सविस्तर माहिती मध्य रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.















Discussion about this post