पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत ‘अकाऊंटन्सी’च्या पेपरसाठी बेसिक कॅल्क्युलेटर वापरण्यास मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांच्या विचारकौशल्यांच्या विकासावर भर देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांच्या समर्थनार्थ ‘सीबीएसई’ने हा निर्णय घेतला आहे.
सीबीएसईच्या प्रस्तावानुसार विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि टक्केवारी गणना यांसारख्या मर्यादित कार्यासह नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी असेल. कॅल्क्युलेटरला परवानगी देऊन बोर्ड विद्यार्थ्यांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे त्यांना मॅन्युअल गणनेऐवजी विश्लेषणात्मक आणि संकल्पनात्मक प्रतिसादांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. अकाउंटन्सी परीक्षांमध्ये कॅल्क्युलेटरचा वापर केल्याने विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया सोपी होईल, ज्यामुळे त्यांना लांबलचक गणिते करण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर आणि लागू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. सध्या, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे. तर, ‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’ने २०२१ पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी दिली आहे.
खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण
राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नवीन कायदा आणणार आहोत. तसेच शालेय शिक्षण सुधारण्यासाठी रोड मॅप आखणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. केंद्र सरकारने खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यासाठी नियमावली करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नवीन अधिनियम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर खासगी शिकवणी वर्गावर अवलंबून राहावे लागते. या दुहेरी शुल्कामुळे पालकांवर आर्थिक ताण येतो, त्यामुळे शासनाने या विषयावर नियमन करण्याचे ठरवले आहे.
Discussion about this post