CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे CBSE बोर्डाने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे.या बदलामुळे विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन संधी मिळतील, त्यामुळे त्यांच्यावर तणाव कमी होण्याची शक्यता आहे. बोर्डाने मंगळवारी या नव्या प्रणालीच्या मसुद्याला अंतिम मंजुरी दिली.
देशात दरवर्षी लाखो-करोडो विद्यार्थी CBSE बोर्डातून दहावीची परीक्षा देत असतात. यातील काही विद्यार्थी उत्तीर्ण होतात, तर काही नापास होतात. नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, आता 2026 पासून CBSE बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, CBSE बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. CBSE नुसार, वर्षातून दोनदा होणारी इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. मात्र, संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन फक्त एकदाच घेतले जाईल. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. मात्र, या सुविधेसाठी विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा शुल्क भरावे लागेल.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार मिळेल. याचा अर्थ, विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा वेळ आणि पद्धत निवडण्याची मुभा दिली जाईल. जर विद्यार्थी दोनदा परीक्षेला बसले, तर त्यांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल.
सध्या, सीबीएसईने तयार केलेल्या मसुद्यानुसार, २०२५ च्या परीक्षेसाठी दोन टप्प्यात परीक्षा होईल. पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ या कालावधीत आणि दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२५ दरम्यान होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षेला बसण्याची लवचिकता मिळेल.
Discussion about this post