जळगाव । रस्ते अपघाताचे प्रमाणत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा वाहनचालकांच्या बेपर्वाईमुळेअपघाताची संख्या वाढत आहे. अशातच जळगाव शहरात भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट घराच्या कंपाऊंडवर आदळली. सुदैवाने एअरबॅग उघडली अन् दोघांचा जीव वाचला आहे. ही घटना जळगाव शहरातील कोल्हे नगर येथे घडली असून याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
अधिक असे की, जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कोल्हेनगर येथे राजू भंगाळे यांचे घर आहे. रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुने भगवान नगरकडून कार क्रमांक (एमएच १९ ईजी १७७८) ही कोल्हेनगरकडे भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट राजू भंगाळे यांच्या घराच्या कंम्पाऊंडंच्या भिंतीवर जावून आदळली.
या घटनेत सुदैवाने कारमधील दोघेजण बॅग उघडल्याने बचावले आहेत. मात्र,अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जवळच कॉलेज असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती अन्यथा मोठी दुर्घटना यावेळी घडली असती अशी यावेळी चर्चा होती. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. अपघातानंतर अडकलेली कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
Discussion about this post