जळगाव |- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहित्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार देण्यासाठी पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांकडून सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षासठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुरस्कारासाठी पात्रता व निकष (राज्यस्तरीय पुरस्कार) महिला व बाल कल्यण क्षेत्रात मौलिक कामगिरी बजावणाऱ्या नामवंत समाजसेविका असाव्यात, महिला व बाल कल्याण क्षेत्रात कमीत कमी २५ वर्षे कार्य केलेले असावे, ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या ५ वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
विभागीयस्तर पुरस्कार (स्वयंसेवी संस्थांकरिता) – महिला व बाल कल्याण क्षेत्रात महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण, पुनर्वसन, अंधश्रध्दा निर्मुलन, जनजागरण इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल, संस्थेचे कार्य महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान ७ वर्षे असावे, ज्या स्वयंसेवी संस्थेस दलितमित्र पुरस्कार मिळालेला आहे त्या संस्थेस हा पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही, संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तीचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.
जिल्हास्तरीय पुरस्कार-महिला व बाल कल्यण क्षेत्रात मौलिक कामगिरी बजावणाऱ्या नामवंत समाजसेविका असाव्यात, महिला व बाल कल्याण क्षेत्रात कमीत कमी १० वर्षे कार्य केलेले असावे, ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे त्या महिलांना जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.
आवश्यक कागदपत्रे – प्रस्ताव धारकांची माहिती, केलेल्या कार्याचा सविस्तर तपशील, वृत्तपत्र बातमी कात्रण व फोटोग्राफस इ., सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापुर्वी पुरस्कार मिळाला आहे काय, असल्यास तपशील, चारित्र्य चांगले असल्याबाबत, त्यांचेविरुध्द कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलिस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र,
संस्थेची आवश्यक कागदपत्रे :- संस्थेची माहिती व कार्याचा सविस्तर अहवाल, वृत्तपत्र बातमी कात्रण व फोटोग्राफस इ., संस्थेच्या घटनेची प्रमाणित प्रत व मागील ५ वर्षाचे वार्षिक अहवाल, संस्था पब्लिक ट्रस्ट ॲक्ट व सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १९६० खाली पंजीबध्द असल्याचे प्रमाणपत्र (७ वर्षापूर्वीचे), संस्थेचे कार्य पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असल्याचे प्रमाणपत्र, यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय, असल्यास तपशील, संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले असल्याबाबत, त्यांचेविरुध्द कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य व संस्था राजकारणापासून अलिप्त् असल्याचे पोलिस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तरी इच्छुक पात्र समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांनी 30 दिवसाच्या आत विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव येथे ३ प्रतीत सादर करावा. विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, दुरध्वनी क्रमांक. ०२५७-२२२८८२८ येथे संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. वनिता सोनगत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Discussion about this post