मुंबई । महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होत असून आज महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे गुलदस्त्यात आहे. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता असून अशातच आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे. त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कुणाला किती मंत्रिपदं मिळणार
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोललं जात आहे. यात राष्ट्रवादीचे 8 नेते, शिवसेना शिंदे गटातील 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. यानुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह ३३ जणांचा समावेश असेल, असे म्हटलं जात आहे.
त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे. आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पंतप्रधानांचा वेळ कमी मिळाल्याने तिघांचा शपथविधी होईल. कोणाला किती खाती मिळतील, याबाबत चर्चा होईल. एकनाथ शिंदे हे योग्य खाती पक्षाकडे घेतील. प्रत्येक पक्ष आपपल्या पद्धतीने मागणी करतील. एकनाथ शिंदेंनी जे मागितलंय त्यावर दुपारपर्यंत निर्णय होईल. भविष्यात काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातील, असे भरत गोगावले म्हणाले.
Discussion about this post