जालना । आज (शुक्रवार, ता. २० सप्टेंबर) सकाळीच मुंबई- पुणे एक्सप्रेसवर तीन वाहनांमध्ये धडक झाल्याची घटना घडली होती. अशातच जालन्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जालना ते वडीगोद्री मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी बस गेवराईकडून जालन्याच्या दिशेने जात होती तर मोसंबी भरलेला आयशर जालन्याकडून गेवराईच्या दिशेने येत होती. यावेळी अंबड वडीगोद्री रस्त्यावर मठ तांडा येथे दोन्ही वाहनांमध्ये समोरा-समोर धडक झाली. बसमध्ये एकूण 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामध्ये ३ ते ४ जण दगावल्याचे सांगण्यात येत असून अनेक जण जखमी झाले आहेत.
गाड्यांचा चक्काचूर…
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना तसेच मृतांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. अपघातातील मृतांचा नेमका आकडा आणि नावे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.















Discussion about this post