लातूर : दुचाकीला वाचवण्याच्या नादात प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली. र्घटनेमुळे बसमधील 37 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून दुचाकीस्वाराचा बेजबाबदारपणा या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं यात दिसत आहे.
ही घटना नांदगाव पाटीजवळ घडली ही बस नांदेडहून लातूरकडे जात होती. त्यादरम्यान ही घटना घडली. अपघात झाल्यावर, स्थानिक पोलीस प्रशासन आणि मदत करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. या जखमींमधील 2 ते 3 प्रवाशांचे हात तुटल्याची माहिती मिळाली आहे, त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया सुरू आहे.
या असल्या बेशिस्त टू व्हीलरवाल्याच्या चुकीमुळे संपूर्ण एसटी बस पलटी झाली….
मोठ्या वाहनास प्रथम प्राधान्य आपण दिले पाहिजे, याबद्दलची जागरूकता कधी आपल्यामध्ये येईल..??
मार्ग : अहमदपूर – लातूर pic.twitter.com/OCGgbHx0a8
— Rohit Dhende (@avaliyapravasi) March 3, 2025
घटनेच्या तपशिलांची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून मदत व बचाव कार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे करत जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवले आणि वैद्यकीय मदत पुरवली. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदतीसाठी अधिक यंत्रणा तैनात केली. जखमींची माहिती त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना फोनवरून देण्यात आली आहे.
या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात दुचाकीस्वाराचा बेजबाबदारपणा आणि रस्त्यावर अचानक वळत बसच्या चालकाला दिशा बदलण्यास भाग पाडल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये बस पलटी होण्याचा क्षण आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसते की, दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे हा अपघात झाला आणि ती बस उलटली.
Discussion about this post