बुलढाणा । राज्यातील अनेक भागात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी महसूल पथकावर होणारे हल्लेही वाढताना दिसत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजामध्ये तलाठ्याने अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून फेकून दिल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरु असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मोठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला अवैध रेती वाहतूकदारांवर कदम कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार काल सायंकाळी नांदुरा शहराजवळ नांदुरा तहसीलचे तलाठी नितीन म्हस्के व कर्मचारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी थांबले. यात एक अवैध रेतीचा डंपर त्यांनी थांबवला. यानंतर चालकास कागदपत्रे विचारले असता त्याकडे काही आढळले नाही. म्हणून सदर तलाठी व कोतवाल अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये बसले व ट्रक सरळ तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचे चालकाला सांगितले.
मात्र चालकाने त्यांना शिवीगाळ करत ट्रक भरधाव मलकापूरकडे घेतला. यानंतर धावत्या ट्रकच्या केबिनमधूनच तलाठी व कोतवालास लाथ मारून ट्रक खाली ढकलले. यात कोतवाल व तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गंभीर कलमान्वये ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप ट्रक चालक फरार आहे.















Discussion about this post