बुलढाणा । राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान बुलढाणामधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाण्यात बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या ३ मतदारांना पकडले आहेत. या तिघांना मतदान प्रतिनिधींनी चांगलाच चोप दिला. तर काँग्रेसने घाटाखालून २ गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे.
बुलढाण्यात बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणाला पकडण्यात आले. या तरुणाला पळवून लावण्यात आले. यामुळे शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. तर बुलढाण्यातील प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. याठिकाणी दोन बोगस मतदारांना पकडण्यात आले. वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता. मोताळा येथील एका व्यक्तीने मतदान केल्यानंतर पकडण्यात आले.
त्याच्यासोबत याठिकाणी आणखी एक जण बोगस मतदान करण्यासाठी आला आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही जण बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.















Discussion about this post