जळगाव । जळगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून भरलेले सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील जैनाबाद भागातील वाल्मिक नगरात कैलास विलास सोनवणे (वय-४७) हा घरगुती गॅसचा गैर वापर करून वाहनात गॅस भरून इंधन म्हणून वापर केला जात असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने बुधवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनीटांनी कारवाई केली.
यात संशयित आरोपी कैलास सोनवणे हा घरगुती गॅस सिलेंडरमधून पंपच्या मदतीने वाहनात गॅस भरत असल्याचे दिसून आला. त्यावेळी पोलीसांनी कारवाई करत त्याच्याजवळून ३ गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचा पंप असा एकुण २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोहेकॉ गिरीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कैलास विलास सोनवणे रा. वाल्मिक नगर, जैनाबाद याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.
Discussion about this post