धुळे । भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या वाहनाला डंपरने समोरून धडक दिली. ही घटना धुळे नजीक चिमठाणे येथे घडली असून यात वाहनाचे नुकसान झाले असून सर्वजण सुरक्षित आहेत. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत असे की, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळे येथे आयोजित लोकसभा क्लस्टर विस्तारक बैठकीनंतर धुळे येथून नंदुरबारकडे त्यांचे खाजगी वाहनाने (क्र.एमएच.३९/७५१५) येत होते. चिमठाणे गावाजवळ समोरुन येणाऱ्या डंपरने (क्र.एमएच.१८ बीजी.२३४८) श्री चौधरी यांच्या वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला. यावेळी वाहनात भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष नीलेश माळी यांच्यासह आणखी दोन जण वाहनात होते. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी चिमठाणा येथील पोलिस कर्मचारी व शिंदखेडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपक पाटील दाखल झाले. चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघातानंतर भाजपचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.घातपाताची शक्यता असल्याचा संशय श्री.चौधरी यांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी धुळे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
Discussion about this post