मुंबई । राज्यात मराठी आणि हिंदीचा वाद पुन्हा एकदा उफळला असून मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. मनसेच्या या कृतीनंतर परराज्यातील अनेक हिंदी भाषिक नेते आक्रमक झाले होते. यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. आपल्या घरात कुत्रेही वाघ असतात, असा टोला लगावलाय. त्याशिवाय दुबे यांनी ठाकरे बंधूंची तुला दाऊत आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे. दुबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंना दुबे यांनी डिवचलेय. दुबे यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मनसैनिक आणि शिवसैनिकांनी आक्रमक पोस्ट करत दुबे यांच्यावर घणाघात केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून या पोस्टनंतर काय भूमिका घेतली जातेय? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मराठी-हिंदी भाषेवर आता पुन्हा एकदा राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निशिकांत दुबे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल करताना कुत्रा आणि वाघ यांची तुलना तर केलीच. पण ते यावरच थांबले नाहीत, दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये दुबे म्हणाले की, मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला. दुबे यांच्या एक्स पोस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंदी-मराठी वाद तीव्र होण्याची शक्यता आहे. दुबे यांच्या या वक्तव्यावर राज्यातील भाजप नेत्यांकडून काय प्रितक्रिया येते, काय भूमिका घेतली जाते? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसैनिकांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
Discussion about this post