मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही नेतेमंडळी सोईचा पक्ष पाहून पक्षांतर करत असून याच इन्कमिंगमुळे पक्षनिष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. दुसरीकडे युती आणि आघाडीच्या राजकारणात जागावाटपामुळेही काही ठिकाणी वाद चालू असल्याचे दिसत आहे. याच वादाचा एक नवा अध्याय आता समोर आला आहे. भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जागावाटपावरून एक लेटरबॉम्ब टाकून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी म्हटलं आहे की, पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. न्याय मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. या लेटरबॉम्बच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच काँग्रेस मधून भाजपात आलेल्या जयश्रीताई पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान जयश्रीताई गटाला 22 जागा देऊ, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. यालाच आक्षेप घेत सुधीर गाडगीळ यांनी थेट पत्र लिहित या जागावाटपाला विरोध दाखवला आहे. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा गाडगीळ यांनी दिला आहे. हा संघर्ष निवडणुकीपर्यंत कायम राहिला तर त्याचा फटका सांगली पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा वाद भाजपाचे वरिष्ठ नेते नेमका कसा सोडवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post