नंदुरबार । ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खान्देशातील नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी आज आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या गद्दारीमुळे मी राजीनामा दिला, असं म्हटलं आहे. दरम्यान हिना गावित आता अपक्ष म्ह्णून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाच्या मुद्द्यावरून हिना गावित नाराज होत्या. भाजपकडून त्यांना या मतदारसंघात उमेदवारी हवी होती. मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे सेनाला मिळाली. त्यामुळे येथे आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावर डॉ.हिना गावित यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तसेच आज त्यांनी थेट पक्षालाच रामराम ठोकला आहे.यामुळे आता अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
भाजपाला रामराम ठोकण्याचं स्वत: सांगितलं कारण
गेल्या १० वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीसोबत काम केलं आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागा शिंदे गटाला मिळाली, आता माझ्यामुळे माझ्या पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या गद्दारीमुळे मी राजीनामा दिला आहे, असं कारण डॉ.हिना गावित यांनी स्वत: सांगितलं आहे.