नागपूर । महाराष्ट्रातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या सरचिटणीस सना खान गेल्या एक आठवड्यापासून जबलपूरमधून बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणाची तक्रार पोलिसात आल्यानंतर तपास सुरू करण्यात आल्यानंतर जबलपूर पोलिसांनी मोठा खुलासा केला, ज्यामध्ये सना खानची हत्या झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी जबलपूर आणि नागपूर पोलिसांनी अमित उर्फ पप्पू साहू नावाच्या आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, अमितने सनाची हत्या केल्याची कबुली दिली.
आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याने पोलिसांना सांगितले की, सनाची काठीने वार करून हत्या केली. यानंतर त्यांचा मृतदेह जबलपूरपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या हिरण नदीच्या पुलावरून फेकून देण्यात आला. अमितचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस आरोपीसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
सना आणि अमित हे पती-पत्नी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. सना खान अमितला भेटण्यासाठी महाराष्ट्रातील नागपूरहून जबलपूरला आली होती. संवादादरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि अमितने सनाच्या डोक्यात काठीने वार केले, त्यामुळे सनाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, त्याचा शोध सुरू आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.