मुंबई । लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे.मुंबईत बॉलीवूड कलाकारांसह राजकीय नेते मंडळी आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. नुकतेच भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी मतदानापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले उज्जवल निकम ?
“लोकशाहीमध्ये मतदान हा एक उत्सव असतो. त्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. यंदा मुंबईकर सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावून उच्चांक मोडतील,” असा विश्वास उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. तर दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यंदा येथे उज्जवल निकम यांना संधी देण्यात आली.
Discussion about this post