सोलापूर । देशात सर्वात दोन मोठ्या पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेसचा समावेश आहे. दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत. आजपर्यंत दोन्ही पक्षांनी मोठी निवडणूक एकत्र लढवली नाहीय. मात्र महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसची युती पाहायला मिळाली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी एकत्रित पॅनल स्थापन केलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आणि नेते बाळासाहेब शेळके यांनी या पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे.
सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनाही सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
मागील निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पॅनलला दिलीप माने यांनी पाठिंबा दिला होता, तर सुभाष देशमुख यांनी विरोधी पॅनल उभं केलं होतं. यंदा मात्र राजकीय समीकरणं बदलली आहेत. सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवतोय. यात पक्षीय राजकारण नाही. दोन्ही देशमुख आमचे नेते आहेत, त्यांना सोबत येण्याचं आवाहन आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करतोय, पण अनेक अर्जांमुळे ते कठीण आहे.” काँग्रेस नेते दिलीप माने यांनी सांगितलं, “मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सचिनदादांनी आम्हाला आवाहन केलं. आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीचं हित हाच आमचा उद्देश आहे. सहकारात मी स्वतंत्र निर्णय घेतो, मी स्वयंभू आहे.” या निवडणुकीतील भाजप-काँग्रेस एकजुटीने आणि सुभाष देशमुख यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे सोलापुरात राजकीय रंगत वाढली आहे.
Discussion about this post