शिरपूर । समोरून येत असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ब्रेक मारल्याने तोल जाऊन खाली पडला. यावेळी मागून आलेल्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू घटना रोहिणीपासून सुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. राजेंद्र यशवंत चव्हाण असे मृत झालेल्या इसमाचे नाव असून याबाबत अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव तालुक्यातील हिसवाळ जामराव चव्हाण (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चुलत भाऊ राजेंद्र यशवंत चव्हाण यांच्याबरोबर दुचाकीने सुळे गावाकडे जात होते. दरम्यान दुपारी दोनला चिलारे गावापुढे बाघी माता मंदिराजवळ त्यांच्यासमोरून विरुद्ध दिशेने दुसरी दुचाकी आली. त्यामुळे राजेंद्र चव्हाण यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला. तोल जाऊन ते रस्त्यावर पडले.
दुचाकीवरून खाली पडताच मागून वेगाने आलेल्या ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या अपघातात राजेंद्र चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक किशोर चव्हाण तपास करीत आहेत.
Discussion about this post