देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा आहे. जनता दल यूनायडेट पक्षाअंतर्गत मोठा उलटफेरविषयी चर्चा सुरू आहे. नितीश कुमार यांना राज्यसभेवर पाठवल्यास बिहारची मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिक्त होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाण्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेडीयू आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये बैठका सुरू असल्याचे समजते. बिहारमधील सध्याच्या संख्याबळाच्या आधारे भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तसेच, नितीश कुमार यांना केंद्रात मोठी भूमिका दिली जाऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा दिल्लीहून तातडीने पटना येथे दाखल झाल्याने चर्चांना अधिक वेग आला आहे. पटना येथे येण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे.
याआधी राज्यसभेसाठी निशांत कुमार यांचे नाव पुढे येत होते. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांत सक्रिय दिसत आहेत. १ मार्च रोजी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उपस्थित राहून केक कापण्याचा कार्यक्रम केला तसेच मंदिरात जाऊन पूजा केल्याचेही समोर आले. या सर्व घडामोडींमुळे बिहारची पुढील सत्ता कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.














Discussion about this post