बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने (भाजप + जेडीयू + इतर) जोरदार मुसंडी मारताना दिसत आहेत. या निवडणुकीत एनडीएने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळविला आहे. तर दुसरीकडे, महागठबंधनला अवघ्या 48-50 जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र आहे. तर बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.
बिहारमध्ये स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने पूर्णपणे नाकारले असून, एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही. पक्षाने उतरवलेल्या 15 उमेदवारांपैकी 13 जणांच्या मतांची संख्या इतकी कमी आहे की, त्यांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांनी बिहारमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार उतरवून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याची रणनीती आखली होती, पण ती पूर्णपणे फसली आहे. पक्ष फुटीपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झारखंड, गोवा, गुजरात, केरळसह अनेक राज्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकद होती. बिहारमध्ये तारिक अन्वरांसारखे नेते होते. मात्र, फूट पल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आणि आता बिहारमधील हा प्रयोगही अपयशी ठरला.
काही उमेदवारांच्या मतांची दयनीय आकडेवारी :
नौटन : जय प्रकाश – केवळ 43 मतं
पिंप्रा : अमित कुमार कुशवाह – 370 मतं
मनिहारी : सैफ अली खान – 196 मतं
पारसा : बिपीन सिंह – 144 मतं
सोनेपूर : धर्मवीर कुमार – 25 मतं
महुआ : अखिलेश कुमार ठाकूर – 149 मतं
राघोपूर : अनिल सिंह – 147 मतं
बाखरी : विकास कुमार – 127 मतं
अमरपूर : अनिल कुमार सिंह – 52 मतं
पटना साहिब : आदिल आफताब खान – 192 मतं
मोहानिया : मुन्ना कुमार – 80 मतं
सासाराम : आशुतोष सिंह – 21 मतं (सर्वात कमी!)
दिनारा : मनोज कुमार सिंह – 53 मतं















Discussion about this post