बिहारमध्ये देशाला हादरवून सोडणारी एक भयंकर घटना समोर आलीय. ज्यात बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात असलेल्या राजीगंज पंचायतीतील टेटगामा आदिवासी पाड्यावर पेट्रोल ओतून एकाच कुटुंबातील 5 सदस्यांना जिवंत जाळण्यात आले. मृतांमध्ये काटो देवी, त्यांचे जावई बाबूलाल उरांव , सीता देवी , मंजित कुमार आणि राणी देवी यांचा समावेश आहे. या हत्येमागील कारणांचा पोलिस सर्व बाजूंनी या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली. एका आदिवासी कुटुंबातील पाच जणांची चेटकीण असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी (7 जुलै 2025) रात्रीच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आदिवासी पाड्यावर शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून या कुटुंबावर चेटकीण असल्याचा संशय काही स्थानिक लोकांकडून व्यक्त केला जात होता. याच संशयातून आणि अंधश्रद्धेतून हा क्रूर प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कुटुंबातील सदस्यांवर पेट्रोल ओतले आणि त्यांना पेटवून दिले.घटनेची माहिती मिळताच पूर्णिया पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अल्पावधीतच तीन संशयितांना अटक करण्यात यश मिळवले आहे. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या हत्याकांडामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून, समाजात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांवर जरब बसवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी वस्त्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Discussion about this post