फैजपूर । शहरातून जात असलेल्या गुटख्याच्या दोन आयशर फैजपूर पोलिसांनी जप्त केली असून सुमारे ८३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. फैजपूर पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली असून या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना बर्हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचार्यांसह बुधवार, 10 रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला. आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ आयशर क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.9364 व एम.एच.19 सी.एक्स.0282) आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणण्यात आली. पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली 83 लाख सहा हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला तर 34 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण एक कोटी 17 लाख सहा हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (33, कोडगाव, ता.चाळीसगाव, ह.मु.शास्त्रीनगर, चाळीसगाव), जयेश सुभाष चांदेलकर (33, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (29, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व मंगेश सुनील पाटील (31, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही आयशर वाहनामागे टाटा हॅरीअर ही गाडी पोलिसांवर लक्ष ठेवून असल्याने या गाडीतील चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे तर हा गुटखा आपला असल्याचा दावा पाटील यांनी केल्याचे समजते. हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.















Discussion about this post