नवी दिल्ली । राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडली. या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायलयाने या महिन्यात दोन्ही प्रकरणी सुनावणी होणार नाही, असे आदेश दिले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातच पुन्हा नव्याने याप्रकरणाची सुनावणी पार पडेल, असे सांगितले आहे.कोर्टाकडून ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
या सुनावणीवेळी सरन्यायाधिशांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वकिलांना चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र न केल्याने दोन्ही ठाकरे गट तसेच शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा, अशा मागणीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली, ज्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र कागदपत्रांची पुर्तता नसल्याने ही सुनावणी दोन आठवडे लांबणीवर गेली आहे.
सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख (मेंशन) कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळं या प्रकरणाची सुनावणी आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post