मुंबई । सध्या कांद्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आतोनात प्रयत्न केले जात असले तरीही कांद्याचे दर काही कमी होताना दिसत नाहीय. देशातील अनेक ठिकाणी कांद्याचे दर ६० ते ८० रुपये किलोच्या आसपास आहेत. आता याच दरम्यान, कांद्याची कमी दरात विक्री करून जनतेला दिलासा देण्याचं सरकारने ठरवलं आहे.
यात दिल्ली-एनसीआर,मुंबईमध्ये ३५ रुपये किलोच्या हिशोबाने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. जेणेकरून सामान्य जनतेवर महागाईची मार पडू नये.मागील १० दिवसात दिल्लीच्या बाजारात कांद्याच्या दरात ५ ते ७ रुपयांची वाढ झाली. तर इतर राज्यातील बाजारात कांद्याच्या दरात ३ ते ५ रुपयांची वाढ झाली. ऑगस्ट ३१ तारखेपर्यंत कांद्याच्या किमतीत ५५ रुपये किलो दर झाला होता. तर सप्टेंबर १० तारखेपर्यंत कांदा प्रतिकिलो ५८-६० रुपये दराने विकला जात आहे.
का वाढले कांद्याचे दर
कांद्याची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर का वाढले याचे कारण सांगितले आहे. मागील श्रावण महिन्यात कांद्याचे दर कमी झाले होते. परंतु आता परत दरात वाढ झालीय. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने कांद्याच्या मालाची वाहतूक होऊ शकली नाहीये. रस्ते वाहतूक बंद असल्याने मालवाहतूक करणारे ट्रक अडकून पडले ते वेळेवर पोहोचून शकले नाहीत. त्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचं कारण व्यापाऱ्यांनी दिलंय.
दरम्यान यावर्षाच्या खरीप हंगामात कांद्याची लागवड १०२ टक्के झालीय. त्यामुळे येत्या काळात कांद्याचा पुरवठा अधिक होण्याची शक्यता आहे. ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कांद्याचे दर ४९.९८ रुपये किलो होते.















Discussion about this post