भुसावळ । भुसावळ, जळगावसह जिल्ह्यातून पुण्याला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर रेल्वे गाड्या उपलब्ध असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. यातच भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस अनेक महिन्यापासून बंद असून ही गाडी पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे. भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस कधी सुरु होईल याची प्रवाशी प्रतीक्षा करीत आहे. अशातच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विकासकामांचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना त्यांनी भुसावळ ते पुणे ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. तथापि, ही रेल्वे गाडी फेर्याने म्हणजेच नंदुरबार, उधना, वसई मार्गाने पुण्याला जाईल अशी शक्यता आहे. यामुळे वेस्टर्न लाईनवर जाणार्या प्रवाशांना लाभ होणार असला तरी भुसावळहून थेट पुण्याला जाणार्यांना मोठा फेरा पडल्याने ते यातून जाणार नाहीत. यामुळे ही ट्रेन सुरू झाली तरी ती दौंड आणि मनमान मार्गाने जाणारी असावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भुसावळ ते पुणे मार्गावरील ट्रेन लवकरात लवकर सुरू करावी यासाठी आता जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी पाठपुरावा करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. याच प्रमाणे भुसावळ ते मुंबई अशी एक्सप्रेस रेल्वे सेवा देखील लवकर सुरू करण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करण्याची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.
Discussion about this post