भुसावळ । भुसावळ शहरात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून भुसावळात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शहराला हादरवणारी घटना समोर आलीय. किरकोळ वादातून एका ४२ वर्षीय तरुणाचा सिमेंटची कुंडी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे शहर हादरले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अनिल ऊर्फ पिंटू आत्माराम सावकारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, अनिल सावकारे हे २७ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास यशोधन पार्कजवळील एका हेअर सलूनसमोर मित्रांसोबत बसले होते. यावेळी आरोपी रोहित पुरुषोत्तम भावसार (रा. नेब कॉलनी) हा देखील त्या ठिकाणी आला. दोघेही दारूच्या नशेत असताना त्यांच्यात ‘वेळ विचारण्यावरून’ शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि आरोपीने अनिल यांना बेदम मारहाण केली.
मारहाणीदरम्यान अनिल सावकारे जमिनीवर पडले असता, आरोपीने त्यांच्या छातीवर बसून हातातील कड्याने आणि जवळच असलेल्या झाडाची कुंडी डोक्यावर दोन-तीन वेळा जोराने आदळली. या भीषण हल्ल्यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेल्या रोहित भालेराव या प्रत्यक्षदर्शीने रात्री १ वाजेच्या सुमारास मयताचे मोठे बंधू भागवत सावकारे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता अनिल सावकारे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भागवत सावकारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रोहित भावसार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे आणि भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post