भुसावळ । जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच भुसावळमधून लाचखोरीची घटना समोर आलीय. ज्यात भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव परिसरातील वाळू व्यवसायाशी संबंधित व्यक्तीकडून ७३ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार संबंधिताने जळगाव एसीबीकडे केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. या सापळ्यात वराडसीम येथील तलाठी नितीन पंडितराव केले, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
जिल्ह्यात सध्या वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही, वरिष्ठांच्या आदेशाच्या नावाखाली ही वाहतूक सुरू ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. त्या मोबदल्यात संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात लाच रक्कम मागितली जात होती. ही कारवाई उजेडात आल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.















Discussion about this post