भुसावळ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच ऑनलाइन गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत भुसावळातील एका व्यक्तीला १९ लाख १ हजार ९९९ रुपयात गंडवण्यात आले. या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी नत्थू प्रसाद प्रजापती (क्य. ४९, रा. जगदिश नगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार के स्ट्रॅटेजी क्लब आणि धोरणात्मक व्यापार गट या नावाने चालणाऱ्या ऑनलाइन ट्रेडिंग गटात त्यांना सहभागी करण्यात आले. गटातील प्रीती यादव, निता जैन या दोन महिलांनी तसेच गटाचा परदेशी प्रशासक अॅडम सॅम्निओटिस या व्यक्तीने विविध मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. तसेच शेअर मार्केटिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले.
या आश्वासनांवर विश्वास ठेवत प्रजापती यांनी ९ ऑगस्ट ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन १९ लाख रूपये पाठवले. पण त्यांना कुठल्याही प्रकारचा नफा मिळाला नाही. भामट्यांनी विविध कंपन्यांच्या सात मोबाइल क्रमांकाचा वापर प्रजापती यांच्याशी संवाद साधण्यासाठी केला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अद्याप कोणालाही अटक नाही.















Discussion about this post