जळगाव । भुसावळात पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या इराणी टोळीविरोधात पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल ४० लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने, १६ मोटारसायकली, एक गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबतची माहिती जळगाव पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यात आंतरराज्य टोळी सहभागी असल्याची शक्यता वर्तविली आहे.
मध्य प्रदेशातील बडोद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्यातील संशयित करारअली हुजूर अली याला अटक करण्यासाठी मध्य प्रदेशातील पोलिस भुसावळात आले होते. भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने ते मुस्लिम कॉलनीत आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले. यावेळी जमावाने हल्ला चढवला होता. छतावरून दगड-विटा फेकणे, दांडक्यांनी मारहाण करणे, तसेच काही महिलांनी पोलिसांना पकडून चावा घेण्यापर्यंत प्रकार घडले होते. या घटनेनंतर संशयित पसार झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात पोलिसांना मोठे घबाड हाती लागले.
एका घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे लगड आढळून आले. चौकशीत मरीयम बी. जाफर अली जाफरी व नाजीया टिपू शेख यांनी हे लगड आणल्याचे कबूल केले. या कारवाईत एकूण १६ सोन्याच्या लगडी जप्त करण्यात आल्या. त्याचे वजन २८७.७ ग्रॅम व किंमत सुमारे ४० लाख २५ हजार रुपये आहे. याशिवाय मजहर अब्बास जाफर इराणी (वय १९) याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंबींगदरम्यान ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक वाहन मुक्ताईनगर येथील गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल तब्बल १६ हून अधिक गुन्ह्यांत या टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले.















Discussion about this post