भुसावळ । भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरामधील ५२ वर्षीय डिगंबर बढे यांनी स्वतःवर गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.12) रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावठी कट्टा त्यांच्या हातात कुठून आला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डिगंबर बढे हे भुसावळमधील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कार्यरत होते. सोमवारी (दि.12) रोजी सकाळी त्यांची पत्नी, मुलगी आणि जावई दीपनगर येथे गेले होते. त्याच दरम्यान, त्यांनी घरात एकटे असताना स्वतःवर गोळी झाडली. गोळी झाडल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिस निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. डिगंबर बढे यांच्याकडे गावठी कट्टा कसा आणि कुठून आला? तो कोणी दिला? त्यांनी तो विकत घेतला की अन्य मार्गाने मिळवला? हे प्रश्न अनुत्तरीत असून पोलिस तपास सुरु आहे.
Discussion about this post