यवतमाळ । डोकेदुखीचा त्रास असलेल्या मुलीशी उपचाराच्या बहाण्याने जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीच्या कुटुंबीयांशी जवळीक साधत भोंदू महाराजाने मुलीला जत्रेला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू केला आहे. प्रकाश नाईक महाराज (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नेर तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे. तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता. काही दिवसानंतर तिच्या लहान बहिणीलाही त्रास होऊ लागला. दरम्यान, गावातील एकाने मुलींच्या वडिलांना तुम्ही सावरगाव काळे येथील प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. वडिलांनी दोन्ही मुलींना उपचारासाठी महाराजाकडे नेले. महाराजांनी उपचारदरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले.
मुली व तिच्या वडिलांना अमरावती जिल्ह्यातील लाखनवाडी येथे जत्रेला घेऊन गेला. त्यामुळे महाराज व मुलीच्या कुटुंबात जवळीक निर्माण झाली. १० जानेवारीला रात्री १२च्या दरम्यान प्रकाश महाराज मुलीच्या घरी कार घेऊन आले. लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो म्हणून २२ वर्षीय तरुणीला आपल्यासोबत नेले. मात्र त्यानंतर महाराज परत आलेच नाही. मुलीच्या वडिलांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल बंद आढळला. लाखनवाडी येथे जाऊन महाराज व मुलीचा शोध घेतला. पण ते दिसले नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलीच्या वडिलांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक करीत आहे.
Discussion about this post