जळगाव । मद्य विक्रीवर वाढीव व्हॅट कराच्या आणि अन्य अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात व निषेधार्थ परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने आज सोमवारी, १४ जुलै रोजी राज्यव्यापी परमिट बार बंद आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान आज जळगावात बिअर बार मालक, वाईन शॉप चालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढत निषेध नोंदवला.
जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन आणि बिअर बार मालक संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील सर्व मद्यविक्री दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्यात आले.
संघटनेने आरोप केला की, अचानक 10 टक्के वाढलेला वॅट, 15 टक्के वाढलेली नूतनीकरण फी आणि तब्बल 60 टक्के पर्यंत गेलेली एक्साईज ड्युटी यामुळे मद्यविक्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. हा निर्णय व्यवसाय उध्वस्त करणारा असल्याचा ठपका संघटनेने ठेवला आहे.
शांततेत आंदोलन, निवेदन सादर
संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाने शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आंदोलकांनी निषेधाचे फलक हातात घेत शासनाच्या निर्णयाविरोधात मूकपणे भूमिका मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना करवाढ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
या धोरणामुळे संपूर्ण उद्योग संकटात सापडला असून अनेक व्यावसायिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापुढेही शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. मूक मोर्चाला व्यापाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा पाठिंबा लाभला.
Discussion about this post