मुंबई । अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. देशात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
देशात पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या कोणतीही टंचाई नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास पुरवठा आणि मागणी यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि कृत्रिम टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणेच इंधन भरावं, असं आवाहन त्यांनी केलंय.पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटी १० रुपयांनी कमी करण्यात आल्याने वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.















Discussion about this post