राज्यात हिट अँड रन च्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच नागपूरमध्ये एका महागड्या ऑडी कारचालकाने तीन वाहनांना उडविल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन जितेंद्र हावरे (वय २४, रा. खामला) आणि रोनित चिंतमवार (वय २७, रा. मनीषनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा महागडी ऑडी कार चालवीत होता. त्याच्या बाजूला रोनित बसला होता. दोघेही रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडने जात असताना वेगामुळे अर्जुनचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने रस्त्यावर असलेल्या दोन कारला धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीला उडविले.
अपघातानंतर कारचालक फरार झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही महागडी ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावावर आहे. घटनेच्या वेळी संकेतचा मित्र अर्जुन गाडी चालवत होता. दरम्यान, ऑडी कारमध्ये राज्यातील दिग्गज भाजप नेत्याचा मुलगा असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तसा आरोपही केला आहे. पण पोलिसांकडून अद्याप याला दुजोरा नाही. अपघातग्रस्त ऑडी कार पोलिसांनी जप्त केली आहे.
होय, गाडी आमचीच, दोषींवर कारवाई करा : बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ही गाडी माझ्या मुलाच्या नावे आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून व दबाव न घेता चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी. सुदैवाने यात जीवितहानी नाही. मी कुठल्याही पोलिस अधिकाऱ्याशी बोललेलो नाही.’















Discussion about this post