जळगाव । आगामी महाशिवरात्री आणि ईद निमित्त केळीची मागणी वाढली आहे. यामुळे केळी भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. केळीला उत्तरेकडे उठाव असल्याने दरही टिकून आहे. त्यामुळे दर १८०० ते २१०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे. केळीची पुढील २५ दिवसांनंतर परदेशात निर्यातही सुरू होणार आहे.
सध्या मृग बहर बागा व पिलबाग केळीमधून आवक सुरू आहे. तसेच उशिरा लागवडीच्या कांदेबाग केळीतही काढणी पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांत केळीची आवक सुरू झाली आहे. गेल्या पंधरवड्यात खान्देशात केळीची प्रतिदिन २४ ट्रक केळीची आवक झाली होती. त्यात पाच ते सहा ट्रकने मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. केळीची आवक मागील पंधरवड्यातील काही दिवस नीचांकी स्थितीत होती. त्यात पुढे आणखी वाढ होईल. थंडीमुळे काढणी रखडत सुरू आहे. तसेच अनेक बागांमधील काढणी घड थंडीत पक्व होत नसल्याने अपेक्षित वेळेत सुरू झालेली नाही. पुढे तापमानात जशी वाढ होईल तशी केळीची आवक वाढेल. दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
बऱ्हाणपुरातील आवकही कमी
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे केळीची आवक कमी आहे. तेथे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर भागातूनही केळीची पाठवणूक केली जाते; परंतु सध्या रावेर, मुक्ताईनगर भागांत केळीची आवक कमी असल्याने दर टिकून आहे. उठावही असल्याने बऱ्हाणपुरातील पाठवणूक फारशी सुरू नसल्याचे चित्र आहे.
Discussion about this post