जळगाव । राज्यात सध्या अवकाळीचे सावट आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात आला आहे. आपल्या डोळ्यादेखत उभं पिक आडवं झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा व चाळीसगावसह इतर काही ठिकाणी अचानक गारपीट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रब्बी हंगामातील केळी, ज्वारी, मका आणि बाजरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिकांची कापणी काहीच दिवसांवर आलेली असताना झालेले हे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. अमळनेर तालुक्यात गारांमुळेकेळी पिकांचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून, केळीची घडं जमीनदोस्त झाली. तर चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने पिलखोड शिवाराला झोडपून काढले.
Discussion about this post