जळगाव । चोरट्यांकडून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने लाखो रुपये किमतीच्या नोटा जळून खाक झाल्याची घटना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात उघडकीस आली.या वेळी अचानक लागलेल्या आगीत एटीएममधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरातील जकात नाक्याजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी हा धाडसी चोरीचा प्रयत्न शनिवारी केला. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लंपास करण्याचा डाव आखण्यात आला होता. त्या उद्देशाने चोरट्यांनी मशीनचा मोठा भाग कापला; मात्र, कटरच्या उष्णतेमुळे आत भरून ठेवलेल्या लाखो रूपयांच्या नोटांना अचानक आग लागली. एटीएममध्ये धूर पसरताच घाबरून चोरट्यांनी घटनास्थळावरून लागलीच पळ काढला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
एटीएम फोडण्याचा हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही चित्रणात स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यानुसार एका मोटारीतून आलेले चार जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी आधी एटीएमवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे फवारून ते निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत असून फुटेजच्या माध्यमातून शोथ घेतला जात आहे.















Discussion about this post