जळगाव । वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे सोमवारी जळगाव दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर जोरदार टीका केली.
नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नव्हे तर तमाशा सुरू आहे, अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी कोण आहेत हेच कळत नाही, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात कुठल्याही पद्धतीने चर्चा होते ना दिसत नाही. या व्यतिरिक्त संसदेत तरुणांनी प्रवेश केला आणि जो धुमाकूळ घातला त्यावर बोलताना दिसत नाही
विरोधकांनी जे प्रश्न विचारायचे आहेत ते सत्ताधारी विचारीत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी जे सांगायचे आहे, ते विरोधक सांगत आहेत.मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते, तेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, याबाबतचा तोडगा आपल्याकडे आहे. परंतु या सरकारला तो आपण सांगणार नाही.
मराठा आरक्षणाबाबत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले, राज्याचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोनी यांनी मराठा आरक्षणाची बाजू उच्च न्यायालयात यशस्वीपणे मांडली. परंतु, सुप्रीम कोर्टात त्यांना बाजू मांडण्यापासून का रोखण्यात आले, त्यांनी न्यायालयात हजर राहू नये असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदेश का दिले, याबाबतचे उत्तर गिरीश महाजन यांनी अगोदर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.















Discussion about this post