धुळ्यामध्ये रात्री घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रभर खळबळ माजवली आहे. ती म्हणजे धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत कोटी ८४ लाख ८४ हजार दोनशे रुपयांची रोकड सापडली. ही खोली शिवसेना आमदाराच्या स्वीय सहाय्यकच्या नावावर गेल्या चार-पाच दिवसांपासून बुक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पर्दाफाश माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
धुळ्यातील विश्रामगृहात खोली क्रमांक १०२ मध्ये एक कोटी ८४ लाख ८४ हजार दोनशे रूपयांची रोख रक्कम सापडली आहे. ही खोली जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने गेल्या ४-५ दिवसांपासून बुक करण्यात आली होती. याची माहिती समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
‘शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर विकासकामांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या, आणि या त्रुटी झाकण्यासाठी शासकीय कार्यालयांमधून कोट्यवधी रुपयांची रोकड या ठिकाणी पोहोचवण्यात आली’, असा त्यांनी आरोप लावला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, “ही रोकड विधिमंडळ अंदाज समितीच्या ११ आमदारांना देण्यासाठी आणली होती”, असा आरोप करत त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.
दरम्यान चौकशी करत पोलिसांनी रूम नंबर १०२ मधील पैसे मोजले. परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले होते याचा खुलासा नसल्याचं त्यांनी सांगितलं. तरी माजी आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, या संदर्भात चौकशीनंतर काय गौडबंगाल समोर येणार आहे, ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post