धुळे : धुळे जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्यानं समोर येत असून अशातच ५० हजार रुपयांची लाच घेताना नगर रचना विभागातील सहायक नगर रचनाकाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या प्रकरणी नगर रचना विभागातील सहायक आरेखक व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकार?
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या शेतजमिनींपैकी सुमारे १० हजार चौरस मीटर क्षेत्र औद्योगिक प्रयोजनासाठी वापरण्याकरिता बिनशेती मंजूरी मिळावी म्हणून ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आला होता.
सदर प्रकरण मंजूरीसाठी नगर रचना विभागाकडे पाठविण्यात आले. या कामासाठी सहायक आरेखक किशोर भोई यांनी स्वत:साठी १० हजार रुपये व सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांच्यासाठी ३० हजार रुपये अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागीतल्याचे तक्रारदार यांनी नमूद केले. यातील १० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्यास सांगण्यात आले होते.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील सहायक दिपक हटकर यांनीही बिनशेती आदेशासाठी लाच मागीतल्याचा आरोप आहे. या तक्रारीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातर्फे १३ जानेवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २१ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाई दरम्यान सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांनी तक्रार दाराकडून ३० हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.















Discussion about this post