जळगाव : जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शनिवारी राज्य शासनाने दोन अध्यादेश काढून सुमारे ३०० कोटींचा निधी मंजूर केला. यामुळे जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ७३ शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार असून वितरण दिवाळीच्या सुट्टीतही तहसील कार्यालयांकडून केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
पहिल्या अध्यादेशानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर मर्यादेतील शेतपीक नुकसानीसाठी मदत दिली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांच्या २ लाख ४७ हजार २६२ हेक्टर क्षेत्रापोटी २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रुपयांची मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे. दुसऱ्या अध्यादेशानुसार फक्त शेतजमिन खरडून गेलेल्या अल्प व अत्यल्प १७१४ भूधारक शेतकऱ्यांच्या ८०९ हेक्टर क्षेत्रापोटी ३ कोटी ७५ लाख ६९ हजारांची मदत दिली जाणार आहे.
‘विशेष पॅकेज’ ११ हजार शेतकऱ्यांना ?
जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यांसाठी ‘विशेष मदत पॅकेज’ जाहीर केले आहे. त्यानुसार या तालुक्यांना ३ हेक्टर क्षेत्रापर्यंत नुकसानभरपाई मिळणार आहे. सोबतच विविध सवलतीदेखील मिळणार आहे. रब्बी हंगामासाठी प्रतिशेतकरी १० हजारांच्या मदतीचादेखील या पॅकेजमध्ये समावेश केला आहे. मात्र, या पॅकेजसंदर्भात कुठलाही अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दोन्ही अध्यादेशांमध्ये समावेश नसलेल्या (जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार) शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ मिळेल. त्या शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ८२ इतकी आहे. तर १४ हजार ८२७ हेक्टर बाधीत क्षेत्रापोटी त्यांना १० कोटी २१ लाख ५ हजार रुपये मिळतील, अशी प्राथमिक स्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य शासनाने काही तालुक्यांना विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश केला होता. दरम्यान, पहिल्या अध्यादेशात एका हंगामात एकदाच विहित दराने मदत देण्याचे आदेश दिले आहे.















Discussion about this post