पुणे : राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. राज्यातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मान्सूनच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे.
यंदा मान्सून केरळात उशिरा दाखल झाला होता. साधारण १ जून रोजी दाखल होणार मान्सून यंदा ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे.
खरिपाच्या कामांना वेग येणार
खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून पूर्वतयारी सुरु आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मशागतीची काम करत आहेत. मान्सूनचं आगमन दक्षिण महाराष्ट्रात झाल्यानं शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गतवर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं हैराण झालेल्या शेतकऱ्याला यंदाच्या मान्सूनकडून अपेक्षा आहेत. मान्सूनचा पाऊस व्यवस्थित झाल्यास राज्यातील शेतकरी शेतीतून भरघोस उत्पन्न काढू शकतात. त्यामुळं यंदाचा मान्सून शेतकऱ्यांना तारणारा ठरतो, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ठरणार आहे.
Discussion about this post