जळगाव । जळगावच्या जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथील एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ.जयवंत जुलाल मोरे (वय 46 पद- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद, जळगाव) असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून ही कारवाई आज ४ एप्रिल रोजी दुपारी केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे(एसीबी)एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदाच्या व्यक्तीला तडजोडीअंती १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच, इतर आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडून जळगाव एसीबीचे पथक माहिती घेत आहे. तर एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील कारवाई करीत आहे.
Discussion about this post