नवी दिल्ली । उष्णतेने कहर केला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलच्या तापमानाने भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेचे रेकॉर्ड मोडले आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान लोकांना अनेक आठवडे उष्णतेचा सामना करावा लागला. हवामानाच्या संकटामुळे देशातील अनेक मोठ्या भागात एप्रिल महिन्यात तीव्र उष्मा जाणवत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, 1901 मध्ये नोंद झाल्यापासून रात्रीच्या तापमानाच्या बाबतीत पूर्व आणि ईशान्य भारतातील हा सर्वात उष्ण एप्रिल होता. सरासरी तापमानाच्या बाबतीत एप्रिल हा तिसरा उष्ण होता. कमाल, किमान आणि सरासरी तापमानाच्या बाबतीत द्वीपकल्पातील हा दुसरा सर्वात उष्ण एप्रिल होता.
हवामान विभागाचे हवामान निरीक्षण आणि अंदाज विभागाचे प्रमुख म्हणतात, “काही राज्यांमध्ये असामान्यपणे उच्च तापमानाचे एक मुख्य कारण म्हणजे एल निनो आणि हवामान बदल. दुर्दैवाने, अद्याप उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत कोणताही डेटा नाही.उल्लेखनीय आहे की, भारतीय हवामान विभागाच्या विश्लेषणानुसार, एप्रिलमध्ये याउलट राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर-पश्चिम भागात सौम्य हवामान दिसले. सततच्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमान नियंत्रणात राहिले.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात वाढ
मंगळवारी पश्चिम बंगालच्या जवळपास सर्वच स्थानकांवर कडक उष्णतेची नोंद झाली होती. यात पनागढमध्ये तापमान 45.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा 10 अंश जास्त होते, तर कलाईकुंडामध्ये ते 47.2 अंश नोंदवले गेले होते, जे सामान्यपेक्षा 10.4 अंश जास्त होते. तर झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बहारागोरा येथे कमाल तापमान 47.1 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा 7.7 अंश सेल्सिअसने अधिक आहे.
राज्यातील या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
देशातील अनेक भागात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात हवामान विभागाने पुढील 24 तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.















Discussion about this post