भुसावळ । मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. यातच आता भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वेगवेगळे दाखल गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले. अतिष रविंद्र खरात (वय-२७) रा. समतानगर, भुसावळ असे या आरोपीचे नाव असून त्याची पुण्यातील येरवाडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले.
अवैधरित्या वाळूची वाहतूक करणे, अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तूंचा काळा बाजार, बेकायदेशीर हत्यार घेवून परिसरात दहशत माजविणे, गावठी दारूची विक्री केल्याप्रकरणी गुन्हेगार आतिष रविंद्र खरात याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३ तर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ४ असे एकुण ७ वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी धोकादायक व्यक्ती या संज्ञेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेला सादर केला होता.
त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून एमपीडीए कायद्यांगर्तत गुन्हेगार अतिष खरात याला १ वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याच्या आदेशाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार गुन्हेगार आतिष खरात याला भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, निलेश गायकवाड, पोहेकॉ अनिल चौधरी, संजय पाटील, संदेश निकम, सोपान पाटील, भुषण चौधरी, दिपक शेवरे, योगेश घुगे यांनी अटक करून येरवडा कारागृहात स्थानबध्द केले.