मुंबई । अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या अवघ्या काही तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. मात्र यानंतर आत अजित पवार यांनी आज (सोमवारी) मंत्री अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड केली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन प्रतोद पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी आपल्याच गटाचा व्हीप लागू होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. खुद्द अनिल पाटील यांनी सदर माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. आता अनिल पाटील व्हीप बजावतील, असे सांगितले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर अजित पवारांचे बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ०५ जुलै रोजी अजित पवार यांनी वांद्रे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व नेते, आमदार, खासदार यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देताना ३५ आमदारांनी सह्या केल्याचे पत्र सादर केले असल्याची महिती समोर आली आहे. मात्र यानंतर एकूण ४२ आमदार अजित पवारांना पाठिंबा दर्शवतील अशी माहिती मिळत आहे.
Discussion about this post