धुळे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा झाल्यानंतर आता पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. राज्यातील महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली मात्र महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर घोडं अडलं असून यामुळे अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झाली नाहीय. यामुळे महाविकास आघाडीमधून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र यातच धुळ्यात ‘मविआ’ च्या शिवसेना ठाकरे गटातर्फे अनिल गोटे यांना दिल्या जाणाऱ्या उमेदवारीवर आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी हे नाराज असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांना जर उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीत बंडखोरी करण्याचा इशाराच थेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांनी दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू असल्याचे उघड होत आहे.
त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातर्फे अनिल गोटे यांना दिली जात असलेली उमेदवारी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना? हे बघणे औचित्याचे ठरणार आहे.