जळगाव । एकीकडे राज्य शासन ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’, ‘लाडका भाऊ’ योजनांचा मोठा गाजावाजा करीत आहे. तर दुसरीकडे मात्र आनंदाचा शिध्याची घोषणा करूनही तो मिळत नाहीय. राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता नवरात्रोत्सव येण्याची वेळ आली असून तरी स्वस्त धान्य दुकानावरील रेशनकार्डधारकांना अद्यापपर्यंत शंभर रूपयात आनंदाचा शिधा पोचलेला नाही.आता ’आनंदाचा शिधा’ दसरा, दिवाळीत तरी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन, अडीच वर्षांपासून राज्य शासनातर्फे अंत्योदय, कुटुंब प्राधान्य तसेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना शंभर रूपयात आनंदाचा शिधा वितरीत केला जात आहे. यंदाही ऑगस्टमध्येच गणेशोत्सवासाठी गणपती व ज्येष्ठा गौरींचे आगमन होण्यापूर्वी सर्वसामान्यांसाठी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येणार, अशी गोड घोषणा राज्य शासनाने जाहीर केली होती. मात्र गौरी व गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर सर्वपित्री दरम्यान श्राद्ध कार्यक्रम देखील पार पडले आहेत.
परंतु आनंदाचा शिधामधील रवा, तेल, मैदा, तूरदाळ चनादाळ, साखर, पोहे यापैकी साखर आणि पामतेल पाऊच अन्य जिन्नस ठेकेदारांकडून स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोचलेच नाहीत. त्यामुळे अंत्योदय, कुटुंब प्राधान्य तसेच पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानावर वारंवार हेलपाटा मारूनही शिधापत्रिकाधारकांच्या पदरात पडलेली नाही. जिल्ह्यात राज्याचे तीन मंत्री आहेत. तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यात आनंदाचा शिध्याचा गोडवा अद्यापही मिळालेला नाही. आता ’आनंदाचा शिधा’ दसरा, दिवाळीत तरी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Discussion about this post