जळगाव | जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जळगावकरांना आणखीण अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन दिली जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांचा प्रवास आणखीण आरामदायी होणार आहे. दरम्यान रेल्वेने ब्रह्मपूर आणि उधना (सुरत) दरम्यान एक नवीन अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्सप्रेसचा उद्धाटन सोहळा आज 27 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या अमृत भारत एक्स्प्रेसमुळे नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होऊ शकणार आहे.
ही गाडी गुजरातमधील उधनापासून ओडिशातील ब्रह्मपूरपर्यंत धावेल. ०९०२१ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस शनिवारी सकाळी १०.५० वाजता उधना स्थानकावरून सुटेल, तर ०९०२२ ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस दुपारी १२ वाजता ब्रम्हपूर येथून सुटणार आहे.
पाच ऑक्टोबरपासून उधना ते ब्रम्हपूर दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस आठवड्यातून एक दिवस दर रविवारी नियमितपणे धावणार आहे. उधना येथून ती सकाळी ०७.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०१.५५ वाजता ब्रम्हपूरला पोहोचेल. याशिवाय, ब्रम्हपूर ते उधना ही गाडी सहा ऑक्टोबरपासून दर सोमवारी रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी ०८.४५ वाजता उधना पोहोचेल. दोन्ही गाड्यांना खान्देशातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी सुरत आणि आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कामगारांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. त्यांना सुरक्षित, जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. अमृत भारत एक्सप्रेसचे उद्दिष्ट सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना आरामदायी प्रवास प्रदान करणे आहे. विविध सुविधांनी परिपूर्ण परंतु नियंत्रित प्रवास भाडे असलेली, ही गाडी सामाजिक-आर्थिक समावेशाचे प्रतीक असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.उधना ते ब्रम्हपूर दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला तब्बल ११ सामान्य (अनारक्षित) श्रेणी आणि आठ स्लीपर व इतर डबे जोडले जाणार आहेत.















Discussion about this post